वसई विरार परिसरात शनिवारी करोनाचे चार नवीन रुग्ण आढळले. यातील एक वसई-विरार शहर महापालिका हद्दीतील, तर तिघे वसईच्या ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागात नालासोपारा पश्चिमेस राजोडी परिसरात दोन, तर विरारच्या आगाशी येथे एक रुग्ण आढळला आहे. हे तिघेही २८ ते ३५ वर्षे वयोगटातील आहेत. वसईच्या ग्रामीण भागातही पहिल्यांदाच करोनाचा रुग्ण आढळला आहे. वसईच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर लोक परदेशात कामाला आहेत.
ग्रामीण भागातील हे तिघेही २१ मार्च रोजी अमेरिकेतील बोस्टन येथून कतारमार्गे राजोडी येथील घरी आले होते. याच विमानात असलेल्या पुण्याच्या एका प्रवाशाला करोनाची लागण झाल्याचे गेल्या आठवड्यात समोर आले. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या राजोडी येथील चौघांना ३१ मार्चपासून विरारच्या बोळींज येथील विलगीकरण केंद्रात ठेवले होते. त्यापैकी तिघांना करोना झाल्याचे शनिवारी अहवालात आढळून आले, एकाचा अहवाल निगेटिव्ह आला. तिघांनाही बोळींज येथील विलगीकरण केंद्रात ठेवल्याची माहिती वसई तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब जाधव यांनी दिली. आरोग्य विभागाने तीन किमी परिसराचे निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
वसई विरार महापालिका हद्दीतही एक रुग्ण आढळल्याचे महापालिकेचे महापौर प्रवीण शेट्टी यांनी सांगितले. नालासोपाऱ्यात राहणारा हा रुग्ण मुंबईत पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करतो. संचारबंदीनंतर तो घरीच होता. करोनाची लक्षणे जाणवल्याने त्याने स्वत: खासगी लॅबमध्ये तपासणी केली. त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.
वसई-विरारमध्ये आणखी चार रुग्ण