सुरक्षेच्या साधनांचा तुटवडा

संचारबंदीच्या काळात खासगी डॉक्टरांना दवाखाने सुरू ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्याने अनेक डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरू केली आहेत. मात्र, मास्क, गाऊन, कॅप, गॉगल आदी सुरक्षेच्या साधनांचा त्यांना तुटवडा भासत आहे. तर रुग्णालयातील डॉक्टरांना कर्मचाऱ्यांची कमतरता भेडसावत आहे. त्यामुळे त्यांच्यातही भीतीचे वातावरण आहे.


वसई-विरार शहरात सध्या साधारण पाचशेहून अधिक खासगी दवाखाने आहेत. त्यापैकी काही दवाखाने बंद असून, बरेच सुरू असलेल्या खासगी दवाखान्यांतील डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खासगी प्रॅक्टीस करणाऱ्या एका डॉक्टरकडे दिवसाला ५० ते १०० रुग्ण येतात. त्यातील बहुतांश सर्दी खोकल्याचे आहेत. त्यांच्यात कुणी करोनाबाधित असू शकतो. त्यामुळे सुरक्षेच्या साधनांअभावी डॉक्टरांना भीती वाटत आहे. खासगी डॉक्टरांकडे मास्क नसतात. त्याचा तुटवडा त्यांना जाणवू लागला आहे. आम्ही पालिकेकडे गाऊन, मास्क, कॅप आणि गॉगल अशा सुरक्षेच्या साधानांची मागणी केली आहे. मात्र, पालिकेकडे असे कुठलेही किट नाही. त्यामुळे आम्ही खासगी विक्रेत्यांकडून अशी साधने मागवली आहेत. मात्र, या साधनांचा तुटवडा असल्याने ती मागवून घेण्यासाठी अजून आठवडा लागणार असल्याची माहिती नालासोपारा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय मांजलकर यांनी दिली.


रुग्णालये सुरू असली, तरी त्यात काम करणारे सफाई कर्मचारी, परिचारिका येत नसल्याच्या तक्रारी अनेक डॉक्टरांनी केल्या आहेत. त्यामुळे काम करण्यात अडचणी येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. परिणामी रुग्णालयातील डॉक्टरांवर अधिक ताण येत आहे. तसेच रुग्णांनी दवाखान्यात आल्यानंतर स्वतःच तीन फुटाच्या अंतरावर थांबणे गरजेचे आहे. आणि शक्यतो गरज असेल, तरच दवाखान्यात जा अन्यथा जाणे टाळा, असे आवाहनही डॉ. मांजलकर यांनी वसई-विरारमधील नागरिकांना केले आहे.