नालासोपारा शहरात पूर्वेकडे भाजीबाजार भरतो. लॉकडाऊनच्या काळातही हा बाजार गर्दीने ओसंडून वाहत असल्याचे चित्र दिसत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मध्यरात्रीपासून पालघरसह वसई विरारमध्ये जिल्हाधिकारी यांनी, व्यक्ती तसेच सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घातली आहे. मात्र नालासोपाऱ्यात या मनाई आदेशाला हरताळ फासल्याचे चित्र आहे.
नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क रस्ता, स्टेशन परिसरातील पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या ब्रिजखाली भाजी मार्केटमध्ये भाजीविक्रेते आणि ग्राहकांची तुडुंब गर्दी आहे. सामाजिक अंतराचे भानही राखत नागरिक बाजरातून फिरत आहेत. मात्र पोलिसांकडून त्यांच्यावरून कोणतीही कारवाई केलेली नाही. तसेच पालिका प्रशासनालाही गांभीर्य नाही.
नालासोपारा सेंट्रल पार्क रस्त्यावरील भाजीमार्केटमध्ये दररोज सकाळी मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत आहे. वसई तालुक्यात करोनाबाधित रुग्णांनी संख्या आता आठ पोहचली आहे. गर्दीच्या ठिकाणी करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.